जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्षांची मंत्री नितेश राणेंवर कायदेशीर कारवाईची मागणी

जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्षांची मंत्री नितेश राणेंवर कायदेशीर कारवाईची मागणी

मुंबई: जमात-ए-इस्लामी हिंद (जेआयएच) महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी नितेश राणे यांच्या भडकाऊ विधानाची निंदा केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

        माध्यमांना दिलेल्या निवेदनात जेआयएच महाराष्ट्र अध्यक्ष म्हणाले, "महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी दिलेली अलीकडील विधाने अत्यंत दुर्दैवी, भडकाऊ आणि समाजात फूट पाडणारी आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे की एका घटनात्मक पदावर असताना, ते केवळ आपल्या शपथेला तडा देत नाहीत, तर देशाच्या संविधानाचा आणि न्यायसंस्थेचा देखील अपमान करत आहेत. नितेश राणे यांच्यावर आधीच 38 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 22 प्रकरणे द्वेषपूर्ण आणि विद्वेष पसरवणाऱ्या भाषणांशी संबंधित आहेत. त्यांच्या अलीकडील विधानांमध्ये त्यांनी मदरशांना दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि राज्यभरातील मुस्लिम संस्थांना संशयास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे केवळ देशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाही, तर घटनात्मक मूल्यांविरोधातही आहे."

           मौलाना इलियास खान फलाही पुढे म्हणाले, "अक्कलकुवा येथील मदरशाविरोधातील त्यांचे आरोप निराधार आणि दुर्भावनापूर्ण आहेत. हा मदरसा 1997 पासून सरकारद्वारे नोंदणीकृत आणि मान्यता प्राप्त आहे. येथे 15,000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी 1,250 हिंदू विद्यार्थी आहेत. याशिवाय, 25 हिंदू शिक्षकही येथे अध्यापन करत आहेत. हा संस्थान केजी ते पीजीपर्यंत शिक्षण प्रदान करतो, ज्यामध्ये आयटीआय, डीएड, बीएड, युनानी कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय, लॉ कॉलेज आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम चालवले जातात. हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे हजारो विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहे. अशा परिस्थितीत, या संस्थेला दहशतवादाशी जोडणे हा विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न आहे. हे केवळ मदरशांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न नाही, तर अल्पसंख्यांकांना भयभीत करून त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याच्या सुनियोजित राजकारणाचाही भाग आहे."

           जेआयएच महाराष्ट्र अध्यक्ष म्हणाले, "आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की नितेश राणे यांच्या या बेजबाबदार आणि भडकाऊ वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्ही आधीच पोलिसात तक्रार दाखल केली आहे, पण नेहमीप्रमाणे एफआयआर दाखल केले गेलेले नाही. जर अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई केली गेली नाही, तर यामुळे सामाजिक सौहार्द धोक्यात येईल. जमात-ए-इस्लामी हिंद अशा प्रकारच्या फूट पाडणाऱ्या राजकारणाचा आणि द्वेषमूलक वक्तव्यांचा तीव्र विरोध करत आहे आणि सर्व धर्म आणि समुदायांना शांतता व न्यायाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे."