सुलभाताई, तुम्ही खरचं बेईमानी केली का?

सुलभाताई, तुम्ही खरचं बेईमानी केली का?

काँग्रेस पक्षाच्या आमदार सुलभाताई संजयराव खोडके आणि स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अमरावती दौर्‍यावरून चांगलेच वाजले. त्याचा आवाज दूरपर्यंत जाईल. उभयतांमधील आरोप-प्रत्यारोप एकमेकांचे मुखवटे फाडत आहेत. आमदार खोडके यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावण्यात आल्याने त्यांनी पक्षादेश झुगारून पक्षाशी बेईमानी खरचं केलेली आहे का? याचे उत्तर तमाम अमरावतीकरांना दिलेच पाहिजे. त्याशिवाय मागासवर्गीय-आंबेडकरी समुदायाच्या मनात काँग्रेसबद्दल निर्माण झालेले संशयाचे मळभ दूर होणार नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले 25 ऑक्टोबरला दोन दिवसीय अमरावती दौर्‍यावर होते. या दौर्‍यापश्चात आमदार सुलभाताई खोडके यांनी जाहीर पत्रक काढून प्रदेशाध्यक्षांच्या दौर्‍यातून शहर जिल्हा पदाधिकार्‍यांनी आपणास जाणीवपूर्वक डावलल्याचा व सातत्याने अवहेलना चालविल्याचा आरोप केला. ते पत्रकच काँग्रेस पदाधिकारी व त्यांच्यातील मतभेद जाहीरपणे प्रकर्षाने समोर आणण्यास आणि वादाच्या ठिणगीस कारणीभूत ठरले. प्रदेशाध्यक्षांचे राजकीय कार्यक्रम जाहीर होते. सन्मान म्हणून त्यांच्या स्वागताला उपस्थित राहून पक्षांतर्गत दुजाभाव वा मतभेदाची बाब सुलभाताई यांना नानाभाऊ पटोले यांच्या कानावर घालता आली असती. मात्र तसे काही न करता त्यांनी जाहीर पत्रक काढून ‘आ बैल मुझे मार’, अशी स्वतःची अवस्था करून घेतल्याचे दिसत आहे. त्यांच्या त्या पत्रकाचे शहर काँग्रेसचे महासचिव विनोद मोदी, सलीम मिरावाले, सुरेश इंगळे, मैथिली पाटील यांच्या चमूने जनता दरबारात पूर्णतः पोस्टमार्टम केलेले आहे. आमदार खोडके या पक्षनिष्ठ नाहीत, त्या काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला बळकट करीत आहेत, निधीवाटप वा मनपातील बैठकांमध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांशी भेदभावाचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत, अशा नानाविध गंभीर आरोपाचा सूर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आवळलेला आहे. अर्थात त्या सुराला स्वर व पार्श्वगायनाची ‘कलाकारी’ पडद्यामागून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची असल्याची शक्यता अधिक आहे.
 
माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख काँग्रेस पक्षात परतल्यापासूनच आमदार सुलभाताई खोडके यांचे ‘शुगर डाऊन’ अन् ‘ब्लडप्रेशर हाय’ झालेले आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या वेळीच सुलभाताई यांनी तिखट प्रतिक्रिया देत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सुलभाताई काँग्रेसचा ‘हात’ सोडायला तयार नाहीत, याचा अर्थ त्यांचा यजमानाच्या ‘घड्याळा’वर विश्वास नाही की काय, असाही होतो. उद्या काय होईल, ते भाकीत आज वर्तवणे तसे कठीणच आहे. परंतु डॉ. सुनील देशमुख यांचा ‘इंटरेस्ट’ अमरावती मतदारसंघात आहे. ते लक्षात ठेवूनच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याचे स्पष्ट आहे. आमदार सुलभाताई या मूळतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. डॉ. सुनील देशमुख यांनी 2014 मध्ये काँग्रेस सोडणे किंवा सुलभाताई यांनी 2014 व 2019 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे या बाबी उभयतांसाठी अपरिहार्य होत्या. आता मात्र, ‘काँग्रेसने दानात दिलेल्या सर्व जागा ताब्यात घ्या’, असे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती मुक्कामी केले.  याचा मतितार्थ सुलभाताई यांनी लक्षात घेतला नसेल, असे नाही. तरीही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीची दावेदारी कायम ठेवल्याने त्याचे वेगळे गणित त्यांच्या डोक्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसारा घाटात ओढायला एक अन् ढकलायला दुसरे इंजिन रेल्वेगाडीला लावले जाते. अमरावती विधानसभेत विजयश्री ओढायला काँग्रेस आणि ढकलण्यासाठी राष्ट्रवादी असे ‘डबल इंजिन’ वापरण्याचा सुलभाताईंचा  प्रयत्न दिसतो. मात्र त्या प्रयत्नांना शहर काँग्रेसने आतापासूनच घट्ट ‘ब्रेक’ लावले आहेत. यात कुणाची तरी रेल्वेगाडी रुळावरून घसरणे निश्चित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना (उद्धव), या संभाव्य युतीत अमरावती राष्ट्रवादीकडे ठेवून बडनेरा शिवसेनेला देण्याचा प्रयत्न होईल.  ‘कौन अपना कौन पराया’ याची चाचपणी या वादातून खोडके करीत नाही ना, अशी शंका उत्पन्न होत आहे, असो.

राज्य विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला पार पडलेल्या निवडणुकीत मागासवर्गीय नेते चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे काँग्रेसने ठरविले होते. तरीसुद्धा हंडोरे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षाने या पराभवाची कारणमिमांसा केली असता काही आमदारांनी हंडोरे यांना मतदानच केलेले नाही, त्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुलभाताई खोडके यांचासुद्धा समावेश असल्याचे चौकशीतून समोर आल्याचा दावा स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केलेला आहे. आमदार सुलभाताई यांनी याविषयावर बाळगलेले मौन कधीकाळी एकनाथ खडसे यांनी बाळगलेल्या मौनाला लाजवित आहे. सुलभाताई खोडके यांच्या विजयात काँग्रेसच्या परांपरागत मतांसह अल्पसंख्यक, मागासवर्गीय मतदारांचा मोठा वाटा होता. सुलभाताई यांनी चंद्रकातं हंडोरे यांना मतदान केलेले नसेल तर ती शुद्ध बेईमानीच आहे. काँग्रेस मागासवर्गीयांना ‘मेन स्ट्रीम’मध्ये येऊ देत नाही, या संशयाला सुलभाताईंची ‘कथित भूमिका’ आणखी गडद करणारी आहे. तो संशयाचा कलंक पुसून काढण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहेच. महाराष्ट्रात सद्यःस्थितीत ‘गद्दार’ आणि ‘खोके’ या दोन शब्दांचा बोलबाला आहे. त्यावरून संबंधितांचा कसा तिळपापड होतो आहे, ते उभा महाराष्ट्र बघतो आहे, याची जाणीव आमदार खोडके यांना निश्चितच असेल, याबाबत कुणाला शंका असण्याचे काही एक कारण नाही.
 
जनहिताची भूमिका, ‘बेईमानी’ सत्यकथन

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा 13 वर्षांपासून हवेत घिरट्या घालत आहे. प्रशासकीय यंत्रणेची गेंड्याची कातडी अमरावतीकरांच्या स्वप्नांना धावपट्टीवर उतरू देण्यास तयार नाही. डॉ. सुनील देशमुख यांच्या पुढाकारात अ‍ॅड. प्रवीण पाटील यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यासाठी डॉ. देशमुख, अ‍ॅड. पाटील अभिनंदनास पात्र आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई नागपुरात असताना अमरावतीच्या रखडलेल्या योजना सोडविण्याची संधी अमरावतीकरांनी गमावलेली असली तरी ‘देर आये दुरूस्त आये’, यानुसार डॉ. देशमुख यांच्या या भूमिकेचे अमरावतीच्या अन्य प्रलंबित प्रश्न, प्रकल्पांबाबत वारंवार अनुकरण होणे आता गरजेचे आहे.

 दुसरी बाब अशी की, बसपचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार प्रांताध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपकुळात दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचा मूळ ‘विलासी’ चेहरा चेतन पवार यांनी आतापर्यंत सोयीचे संधीसाधू राजकारण केलेले आहे. पाच वर्षांपासून आपण सभागृहात भाजपसोबतच होतो, असे ‘बेईमानी’ सत्यकथन त्यांनी स्वतःच केले आहे. भाजपने चेतन पवार यांचे बसपा प्रदेश उपाध्यक्ष पदावरून शहर उपाध्यक्ष पदावर ‘डिमोशन’ करून ‘किरीट सोमय्या’ यांना राज्यपातळीवर पर्याय उभा होणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसते.  जे राष्ट्रवादी, बसपाचे होऊ शकले नाहीत, ते आपले कसे होतील, हे भाजपने ‘संजय’दृष्टीने पाहणे गरजेचे ठरणार आहे.

-गोपाल रा. हरणे, अमरावती