मंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्फ बोर्डवर बसवला आपला माणूस? : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकाऱ्याची विशेष अधीक्षक म्हणून नियुक्ती
औरंगाबाद, ११ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने काल दिनांक १० नोव्हेंबर रोजी परभणी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले कृषी अधिकारी मुशीर अहमद शेख यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर विशेष अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीचे आदेश काढले आहे. या आदेशावर अल्पसंख्यांक विकास विभागाचे डेस्क ऑफिसर आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळणारे जुनेद सय्यद यांची स्वाक्षरी आहे.
जिल्हा परिषद परभणी येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी मुशीर अहमद शेख हे माजी कृषिमंत्री तथा सध्याचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचे जवळचे असल्याने त्यांनीच मुशीर अहमद शेख यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर प्रतिनियुक्तीवर आणले असल्याची चर्चा वक्फ मंडळाचे गोटात सुरू आहे.
मुशीर अहमद शेख यांना एक वर्षासाठी विशेष अधीक्षक म्हणून वक्फ मंडळावर प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने मान्यता दिलेल्या एकूण १७९ पदांपैकी दोन पदे विशेष अधीक्षकांची आहेत. या विशेष अधीक्षकांची दोन पदे वक्फ मंडळात सध्या नेमणुकीस असलेल्या अधीक्षकांना पदोन्नती देऊन भरायचे आहे? की प्रतिनियुक्तीने भरावयाची आहे? याबद्दल रिक्रुटमेंट रुल्स मध्ये काहीच नमूद नसल्याचा फायदा घेऊन प्रतिनियुक्तीने हे १ पद भरण्यात आले असल्याची चर्चा आहे. विशेष अधीक्षकाचे दुसरे रिक्त पद सध्या बोर्डात कार्यरत असलेले अधीक्षकांना पदोन्नती देऊन भरण्यात येणार आहे? की असेच बाहेरून आयात करून प्रतिनियुक्तीवर भरण्यात येईल? मुशीर अहमद शेख यांना कोणत्या उद्देशाने आयात करण्यात आले? याबद्दल उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालयीन मंजूर रचनेनुसार २ विशेष अधीक्षकांनी खालील नमूद केल्या प्रमाणे कारभार सांभाळावयाचा आहे.
विशेष अधीक्षक -१ : नोंदणी व भंडार शाखा, आस्थापना व कजाअत शाखा, अभिलेख शाखा, लेखा शाखा, लेखापरीक्षण शाखा, संगणक शाखा आणि बैठक व सुनावणी शाखा.
विशेष अधीक्षक - २ : विधी शाखा, कोकण विभाग शाखा, पुणे विभाग शाखा, नाशिक विभाग शाखा, विदर्भ विभाग शाखा, औरंगाबाद विभाग शाखा आणि नांदेड विभाग शाखा.
प्रतिनियुक्तीवर वक्फ मंडळात आयात झालेले मुशीर अहमद शेख यांना विशेष अधीक्षक-१ म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे? की विशेष अधीक्षक-२ म्हणून नियुक्ती दिली जाईल? याबाबत खमंग चर्चा सुरू आहेत.