HITFIRE : पवारांना धमकीने काय साध्य होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांचा ‘दाभोलकर’ करण्याच्या धमकीवरून संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण मान्सूनच्या आगमनावर पुन्हा एकदा तापले आहे. शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देणारे सकृतदर्शनी चेहरे उघड झाले. त्या साखळीतील एक कडी असलेला सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे समोर आलेले आहे. ओठावर काय आणि पोटात काय, हे सांगणारा खरा चेहरा बुरख्यातून बाहेर आलेला आहे. भाजपनेही कुठलाही आडपडदा न ठेवता सौरभ भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आणि पक्ष त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना ही बाब भूषणावह वाटत असली तरी या धमकीप्रकरणाने अमरावतीच्या नावाला काळीमा फासली गेलेली आहे.
शरद पवार यांची संपूर्ण हयातच राजकारणात गेलेेली आहे. देशाच्या केंद्रीय राजकारणात त्यांचा वरिष्ठ नेते व राज्यात ‘जानताराजा’ म्हणून लौकीक आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध विचारधारा असलेले राजकीय पक्ष व संघटनांचे वरिष्ठ नेते त्यांच्याबद्दल बोलताना एकदा नव्हे अनेकदा विचार करतात, त्यांचा शब्द टाळण्याचे धाडस बडेबडे नेते करीत नाहीत, हे वर्तमानाने अनुभवलेले आहे. अशा अनुभवी अजातशत्रू पुरोगामी व्यक्तीमत्त्वाला संपविण्याचा विचार कुणाच्या मनाला शिवतो आणि नुसता शिवतच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होतो, तेव्हा पडद्यामागे त्यापेक्षाही मोठी खलबते होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ नेते आणि स्पष्ट वक्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आला. त्या पाठोपाठ आता शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’, अशी धमकी देणारा मेसेज ट्विटरवरून व्हायरल करण्यात आलेला आहे. ना. गडकरी यांना धमकी देणारा गुंड होता, शरद पवार यांना धमकी प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ हा भारतीय जनता पार्टीप्रणित युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे, हा दोन प्रकरणातील मुलभूत फरक आहे. गुंड, बदमाश कायद्याने केव्हाही वठणीवर आणले जाऊ शकतात. पण ‘व्हाईट कॉलर क्रिमिनल’वर नियंत्रण मिळविण्याचे व्यवस्थेसमोर खरे आव्हान आहे. त्याही पुढे जाऊन यासर्व घटना पुरोगामी विचाराच्या, शांतवृत्तीच्या महाराष्ट्रातच का घडताहेत. एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग पळविले जातात, राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली जाते, दररोज नव्या वादाला जन्म देऊन हिंसक कारवायांना खतपाणी घातले जाते, यामागे कुठली वेगळी ‘स्ट्रॅटेजी’काम करीत आहे का, याचा वेगळ्या अंगाने विचार होण्याची गरज आहे.
शरद पवार यांना धमकीच्या अमरावती कनेक्शनमधील सौरभ पिंपळकर याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अमरावती विद्यापीठ पेपरफुटीच्या प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. हा अपवाद वगळता त्याची ‘प्रिव्हिअस हिस्ट्री’ गुन्हेगारी स्वरूपाची नाही, मात्र गत आठवड्यात ओडिशातील रेल्वेअपघात असो वा औरंगजेबच्या संदर्भात शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून केलेल्या फेसबूकवरील पोस्ट या त्याच्यातील प्रवृत्तीची प्रचिती देतात. आमदार नितेश राणे यांनी त्याचीच रि ओढून औरंगजेबाच्या पुनर्जन्मावरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती, हे येथे उल्लेखनिय. सौरभने स्वतः ट्विट केले की कुणाचे ट्विट रिट्विट केले, ते तपासात समोर येईलच, परंतु तो काहीही बोललेला असेल तरी कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीशी भाजप आहे, अशी स्पष्टोक्ती आमदार नितेश राणे यांनी अमरावतीत दिलेली आहे. इतर पक्षाच्या लोकांनी भाजप नेत्यांविषयी काहीही बोलावे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसावे, असे होणार नाही, असे सांगत नितेश राणे यांनी सौरभच्या कृतीचे समर्थन करीत त्याच्या विध्वंसक वृत्तीला एकप्रकारे राजाश्रय दिलेला आहे. कुणाला संपविण्याच्या धमकीचे समर्थन कसे काय केले जाऊ शकते? इतर नेत्यांच्या, भाजप नेत्यांवरील राजकीय टीका आणि पवारांना संपविण्याची धमकी यातील तफावत आमदार नितेेश राणे यांच्या वैचारिक उंचीने सोयीस्करपणे दुर्लक्षित केली, ही बाब चिंताजनक नक्कीच आहे.
शरद पवार यांना धमकी प्रकरणात खा. सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी नर्मदा पटवर्धन आणि सौरभ पिंपळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात झळकलेले आहे. सौरभ पिंपळकर हा ‘आयडेंटीफाय’ झालेला आहे, परंतु नर्मदा पटवर्धन कोण, ते तूर्त अस्पष्ट आहे. सोशल मीडिया हाताळताना कुणी कुणाच्या नावाचे ‘फेक अकाऊंट’ तयार करू शकतो. संबंधित अकाऊंट कुठल्या ‘आयपी अॅड्रेस’वरून तयार करण्यात आले होते, ते सायबर पोलीस इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर यांच्याशी पत्रव्यवहार करून सहज शोधून काढू शकतात. भविष्यात ते यथावकाश समोर येईलच. यावर बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास असल्याचे म्हटलेले आहे, असे असले तरी या प्रकरणात सौरभ पिंपळकर याचा ‘थेट संबंध’ दिसून आला नाही तर पोलीस तडकाफडकी ते जाहीर करतील आणि पळवाट शोधून त्याला क्लिनचिट देतील, अथवा संबंध दिसून आला तर प्रकरण चौकशीच्या नावावर थंडबस्त्यात ठेवतील, ही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी सत्तेचा खेळ आहे.
देशात ज्या विचारांच्या बीजाची जाणीवपूर्वक पेरणी होत आहे, ते अंकुरण्यास सुरूवात झालेली आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’, या शब्दपालवीतून त्याची झुळूक दिसलेली आहे. धर्म कुठलाही असो, त्यावर अतिक्रमण, आक्रमण होत असल्याचे भासवून डोकी भडकविली जातात. अराजकता निर्माण केली जाते. इतिहास साक्षी आहे. त्यातून सदैव नुकसानच झालेले आहे. शरद पवार यांना धमकीच्या अमरावती कनेक्शनचा विचार करता, ही बाब भविष्यात अमरावतीच्या विकासासाठी मारक ठरू शकते. मंत्रिपद भूषविलेल्या ‘सिनिअर’ आमदार प्रवीण पोटे वा खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कालपरवा आमदार झालेल्या नितेश राणे यांना नेता मानावे लागते, त्यांच्या बाजूला बसावे लागते, ही स्थिती आजही आहे आणि ती समजून घेतली पाहिजे. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, नाशिकराव तिरपुडे आणि आता देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता महाराष्ट्राची सत्तासूत्रे दीर्घकाळ पश्चिम महाराष्ट्राकडे राहिलेली आहे. सत्ता कायम कुणाचीच राहिलेली नाही, हे खरे आहे, पण आता जेव्हा विकासकामांचा विषय येईल, तेव्हा द्वेष व तिटकारा नेत्यांमध्ये जागृत होणार नाही, नाक मुरडले जाणार नाही, याची शाश्वती अमरावतीला कोण देणार? सौरभ याने जो काही प्रकार केला, तो त्याचा शुद्ध नालायकपणा होता, त्याचे समर्थन करण्याचा मूर्खपणा कुणीही करणार नाही, ते आशादायी चित्र अमरावतीत दिसून येत आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल!
-गोपाल रा. हरणे, वरिष्ठ पत्रकार,
अमरावती. 9422855496